मुंबई: बहुजननामा ऑनलाईन – वेबमालिका दिग्दर्शकाकडून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन एक लाख ७० हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी एका अभिनेत्रीसह तिघांविरोधात पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेबमालिकेसाठी या दिग्दर्शकाला अभिनेत्रीची गरज होती. त्याचा शोध सुरु असतानाच एका मध्यस्थाच्या माध्यमातून त्याची या अभिनेत्रीशी ओळख झाली. त्यानंतर वेबमालिकेच्या ऑडिशननिमित्त त्या दोघांची कांदिवली परिसरात भेट झाली. त्यानंतर दोघांनी परस्परसंमतीने शारीरिक संबंध ठेवले. या अभिनेत्रीच्या मित्राने काही दिवसांनी दिग्दर्शकाशी संपर्क साधला आणि तिचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी देत दिग्दर्शकाकडे चार लाख रुपयांची खंडणी मागितली. गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने या दिग्दर्शकाने आरोपींची घाटकोपर येथे भेट घेतली. या वेळी अभिनेत्री, तिचा मित्र आणि अन्य दोघे त्याच्या वाहनात जबरदस्तीने बसले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून घाटकोपर, सायन परिसरांत दिग्दर्शकाला फिरवले.
भ्रमणध्वनीवरून ऑनलाइन पद्धतीने चार लाख रुपये हस्तांतरित करण्याचा या सर्वानी प्रयत्न केला परंतु तांत्रिक बाबींमुळे केवळ दीड लाख रुपये हस्तांतरित झाले. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शकाला एटीएम सेंटरमधून आणखी २० हजार रुपये काढण्यास भाग पाडले. हे सर्व पैसे घेऊन सर्वानी पोबारा केला.