मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने गेल्या महिन्यात कर्जाचा व्याजदर 0.20 टक्क्यांनी कमी केला होता. शुक्रवारी बँकेने सर्व मुदतीच्या कर्जदरात 0.10 टक्क्याची कपात केली आहे. गुरुवारी रिझर्व्ह बँकेने पतधोरणात प्रमुख व्याजदर जैसे थेच ठेवला होता. त्यानंतर कॅनरा बँकेने कर्जदरात कपात केली. आज आणखी एका बँकेने व्याजदर कमी केले आहेत. एचडीएफसी बँकेने कर्जदरात कपात करत ग्राहकांना दिलासा दिला आहे.
एचडीएफसी बँकेने आज MCLR चा आढावा घेतला. ज्यात बँकेने कर्जदर 0.10 टक्क्यांनी कमी केला आहे. नवे कर्जदर तात्काळ लागू झाले असल्याचे बँकेने म्हटले आहे. एक दिवसाचा एचडीएफसी बँकेचा MCLR 7 टक्के झाला आहे. यापूर्वी तो 7.10 टक्के होता. 1 महिन्यासाठी कर्जदर 7.05 टक्के झाला असून यापूर्वी तो 7.15 टक्के होता. याच प्रमाणे 3 महिन्यासाठी 7.10 टक्के, 6 महिन्यासाठी 7.2 टक्के 1 वर्षासाठी MCLR7.35 टक्के, 2 वर्षासाठी 7.45 आणि 3 वर्षासाठी 7.55 टक्के व्याजदर राहील, असे बँकेच्या संकेतस्थळावर म्हटलं आहे.
आरबीआयचे पतधोरण जाहीर झाल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने देखील व्याजदारत कपात केली आहे. कॅनरा बँकेने विविध मुदतीच्या कर्जाचा दर .30 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. एक दिवसाचा MCLR 0.20 टक्क्याने कमी करून तो 7 टक्क्यांवर आणला. कॅनरा बँकेचा 3 महिन्याचा कर्जदर 7.15 टक्के असून 6 महिन्यासाठी 7.40 टक्के राहील. 1 वर्षासाठी MCLR 7.45 टक्के राहील असे कॅनरा बँकेने म्हटले आहे.