मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पत्नीकडून पैसे मागणे चूक नाही आणि या कृतीला आयपीसीच्या कलम 498A नुसार त्रास देणे मानले जाऊ शकत नसल्याचे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने म्हटले आहे. लग्नानंतर नऊ वर्षानंतर पत्नीच्या आत्महत्त्येला जबाबदार असा आरोप असलेल्या एका व्यक्तीची नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता करताना हा निर्णय दिला. पैशांसाठी पती पत्नीला मारहाण करत असल्याचा आरोप आरोपीवर होता. यावर न्यायमुर्ती पुष्पा गनेडीवाला यांनी म्हटले की पैशांची मागणी करणे अपराध नाही.
या दांपत्यांनी 1995 मध्ये घटस्फोट घेतला होता. मात्र 12 नोव्हेंबर 2004 रोजी पत्नीने आत्महत्या केली होती. पीडितेच्या वडिलांनी दरभा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हुंडा न दिल्यामुळे मुलीला पती आणि सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात होता, असा आरोप मयत महिलेच्या वडिलांनी केला होता. सत्र न्यायालयाने 2 एप्रिल 2008 रोजी आयपीसीच्या कलम 306 आणि 498 A नुसार पती प्रशांत जरे यांना दोषी ठरवलं होतं.
सत्र न्यायालयाने कलम 306 (आत्महत्येस प्रोत्साहन) या गुन्ह्यासाठी त्यांनी 3 वर्षे तर 498 A या गुन्ह्यासाठी 1 वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेविरोधात पतीने हायकोर्टात धाव घेतली होती.यावर न्यायमुर्ती पुष्पा गनेडीवाला यांनी निर्णय दिला. पतीची निर्दोष मुक्तता करताना न्यायालयाने परिवारातील इतर सदस्यांना देखील आरोप मुक्त केलं.
न्यामूर्ती गनेडीवाला यांनी म्हटलं की, पीडितेच्या अल्पवयीन मुलीची पोलिसांनी चौकशी केली. कारण ही दुर्घटना घडली तेव्हा ती तिथे उपस्थित होती. आरोपी जेरेने पीडितेला मारलं होतं आणि तिला विषप्राशन करण्यासाठी भाग पाडलं होतं. मात्र, फिर्यादी पक्षाने आश्चर्यकारक पद्धतीने या प्रकरणाला आत्महत्या म्हणून नोंदवलं होतं. असं त्यांनी आदेशात म्हटलं आहे.