नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाला विजय मिळवून देणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. शनिवारी संध्याकाळी धोनीने त्याच्या इन्स्टाग्राम वरून ही माहिती दिली. त्याच्या या घोषणेनंतर अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातील ‘कभी-कभी’ सिनेमातील गाणं व्हायरल होत आहे. या तर जाणून घेऊया यामागची कहाणी….
का होत आहे हे गाणं व्हायरल ?
धोनीने निवृत्तीची घोषणा करत इंस्टाग्रामवर जी पोस्ट शेअर केली, त्यात एक व्हिडिओ देखील आहे. धोनीने या व्हिडीओ मध्ये त्याच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे आणि अविस्मरणीय असे क्षण शेअर केले आहेत. आणि या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला अमिताभ बच्चन यांच्या ‘कभी- कभी’ या सिनेमातील “मैं पल दो पल का शायर हूँ” हे गाणं चालू आहे. या गाण्याने धोनीच्या चाहत्यांना भावुक केले आहे. त्यानंतर मात्र सोशल मीडियावर या गाण्याची चर्चा सुरु आहे.
कोणी गायलं आणि कोणी लिहिलं हे गाणं
‘मैं पल दो पल का शायर हूँ’ सन 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कभी- कभी’ या सिनेमातील हे गाणं आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, रेखा, वहिदा रहमान, शशी कपूर, ऋषी कपूर आणि नीतू सिंह मुख्य भूमीकेत दिसले होते. ‘मैं पल दो पल का शायर हूं’ हे गाणं मुकेशने गायलं होतं. तर खय्याम आणि साहिर लुधियाना यांनी संगीत दिलं होतं. साहिरला याबद्दल फिल्मफेअर अवोर्ड मिळाला होता. मुकेशला प्लेबॅक सिंगर अवोर्ड मिळाला होता.
धोनीसोबत रैनाने देखील केली निवृत्तीची घोषणा
महेंद्रसिंग धोनीसोबतच सुरेश रैनाने देखील निवृत्तीची घोषणा केली आहे. या दोघांच्या एकत्र निवृत्तीने बॉलिवूड अभिनेते देखील भावुक झाले आहेत. रितेश देशमुखने ट्विट करत लिहिलं की, ‘धोनी कायम आमच्या हृदयात राहील.’ तसेच वरुण धवन, तापसी पन्नू आणि सिंद्धांत चतुर्वेदी हे देखील भावुक झाले. याआधी धोनीवर आधारित सिनेमा देखील काढण्यात आला आहे. या सिनेमात धोनीची भूमिका सुशांत सिंह राजपूतने साकारली होती.