देहारादून वृत्तसंस्था – उत्तराखंडमधील भाजप आमदाराने दारूच्या नशेत चक्क हातात, तोंडात १-२ नाहीतर ४ बंदुकांसह नाचतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. भाजप आमदार प्रणव सिंह हे आपल्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. परंतु यावेळी हा व्हिडीओ समोर आल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत. हा व्हिडीओ २-३ दिवसांपुर्वीचा असण्याची शक्यता आहे.
एका हातात दारूचा ग्लास, एका हातात ४-४ बंदुका
आपल्या पायाचे ऑपरेशन केल्यानंतर घरी आल्यानंतर प्रणव यांनी आपल्या समर्थकांसह जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळचा हा व्हीडिओ असावा असा अंदाज आहे. या व्हीडिओमध्ये प्रणव सिंह उत्तराखंडबद्दल अभद्र भाषेचा वापर करत आहेत. तसंच एका हातात दारूचा ग्लास आणि एका हातात ४ प्रकारच्या बंदुका घेऊन नाचत आहे. लांबा लांबा घूंघट काहे को डाला…. हे गाणं सुरु आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे समर्थकही नाचताना दिसत आहेत.
माझ्याशिवाय देशात कुणी असं करु शकत नाही
प्रणव सिंह या हत्यारांची वाहवाही करताना दिसत आहेत. तर यावेळी त्यांचे समर्थक त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत. पूर्ण उत्तराखंडमध्य फक्त तुम्हीच असे करू शकता, अशा शब्दात त्यांचे समर्थक त्यांचे कौतुक करत आहेत. तर त्यावर प्रणव सिंह हे गर्विष्टपणे उत्तराखंड मध्येच काय पूर्ण देशात असं कोणीच करू शकत नाही, जे मी करू शकतो, अशी उत्तर देत आहेत. तसंच यावेळी ज्या जनतेने त्यांना निवडून दिले त्याच जनतेला शिव्या देत आहेत.
पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडीओ झाला होता व्हायरल
प्रणव सिंह यांना आपल्या याच वागणुकीमुळे पक्षातून निलंबित केले आहे. त्यांचे वर्षात असे किती व्हीडिओ व्हायरल होतात हे सांगता येणार नाही. या पूर्वीही त्यांचा असा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यात ते एका पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देताना दिसले होते. त्या पत्रकाराने त्यांच्या विरोधात पोलीसात तक्रारही दाखल केली होती.
याआधी तीन महिन्यांसाठी पक्षातून निलंबित
दरम्यान, जूनमध्येच प्रणव सिंह यांना भाजपने तीन महिन्यांसाठी पक्षातून निलंबित केले होते. तसंच त्यांच्यावर अनुशान आणि पत्रकारांविरोधातील वागणुकीबाबत कारवाई केली होती. त्यानंतर ते पक्षातील कार्यात सहभागी होताना दिसले नाहीत. मात्र त्यांचे असे व्हीडिओ व्हायरलं होण्याचे थांबले नाही. आता भाजप त्यांच्या या व्हीडिओवर काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे आहे.