जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भालेराव प्रतिष्ठानतर्फे भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानच्यावतीने खुल्या भीमगीत गायन, चित्रकला, क्ले मॉडेलिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय व महावीद्यालयीन गटाकरिता चित्रकला व क्ले मॉडेलिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. भीम मोहत्सवाच्या कार्यक्रमांची सुरुवात ही जोतिराव फुले जयंतीदिनी दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ६:३० वा. परिवर्तनवादी कवी संमेलनाने होणार आहे.
खुल्या भीमगीत गायन स्पर्धा दि.१२ एप्रिल रोजी दुपारी ४:०० वा. बालगंधर्व खुले नाट्यगृह जळगाव येथे आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच दोन उत्तेजनार्थ बक्षीस सगुणाबाई कोसोदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणार आहे. दि.१३ एप्रिल रोजी सकाळी १० वा. जिल्हा परिषद समोरील शामा प्रसाद मुखर्जी उद्यानात चित्रकला स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. या स्पर्धेकरिता शालेय गटातील विजेत्यांसह त्याचप्रमाणे महाविद्यालयीन गटाकरिता प्रथम, द्वितीय तसेच तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्याच ठिकाणी क्ले मॉडेलिंग या स्पर्धेचे आयोजन सकाळी १० वा. करण्यात आलेले असून पहिल्या तीन विजेत्यांना बक्षीस वितरण केले जाणार आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी सहभागाकरिता दीपक जोशी डी.जे. मेडिकल, वृंदा बुक डेपो शेजारी, नवीपेठ तसेच शरद भालेराव, हरिशचंद्र सोनवणे, कुलदीप भालेराव यांचेशी संपर्क साधून नावे नोंदवावीत, असे आवाहन भालेराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र भालेराव, सिद्धार्थ लोखंडे, विजय कोसोदे यांनी केले आहे.