पुणे बहुजननामा ऑनलाईन – राज्यात सध्या पावसामुळे महापूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रात जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे या स्थिती भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन या सर्व संघटनांच्या कार्यकर्त्यांना मदतीसाठी आपापल्या ठिकाणी हजर होण्याचे आवाहन भारिप बहुजन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन या सर्वांना तातडीने सुचित करण्यात येते की, गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस आणि पुराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या भागातील अनेक गावांना मदत पोहचलेली नाहीये. या सर्वांसाठी पक्षपातळीवर आपण सर्वांनी ताबडतोब मदतीसाठी हजर राहावे.
तसेच पक्ष पातळीवर अन्न, औषधे, कपडे, सॅनिटरी पॅडस, ओडोमॉस- डासांपासून संरक्षण, ब्लॅकेटस्, थंडीपासून बचावाचे कपडे आदी साहित्य उपल्बध करावे. अशी सर्व कार्यकर्त्यांना व समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे. अशा पद्धतीने एक पत्रक काढून प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी मदतीसाठी आवाहन केले आहे.