पटणा वृत्तसंस्था : आजकाल आपल्या शान- शौकतीसाठी लग्नाच्या वरातीत हवेत गोळीबार करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. पण या ट्रेंडच्या हौसेपायी कित्येक जणांना आपले प्राण गमवावे लागले. अशाच एका लग्नाच्या वरातीत करण्यात आलेल्या गोळीबारात नवऱ्या मुलाच्या भावाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी वारंवार सूचना देऊनही येथे हवेत गोळीबार करण्याचे प्रकार थांबवण्याचे नाव घेत नाही. विवाहसोहळ्यात उघडपणे डीजेच्या तालावर नाचत मौजमजेसाठी गोळीबार केला जातो. रविवारी देखील येथे अशीच एक घटना घडली, ज्यामध्ये नवऱ्या मुलाच्या भावाचाच मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त जमावानं आरोपी तरुणाला बेदम मारहाण केली. ज्यामध्ये त्या तरुणाचा जीव जाऊ शकला असता परंतु सुदैवानं पोलीस वेळीच घटनास्थळी दाखल झाले आणि हि जीवितहानी टाळता आली.
मसूरचक गावातील रहिवासी मोहम्मद अकबर यांच्या मुलीचा विवाह खगडिया जिल्ह्यातील फुलतौरा गावातील सरफराजसोबत ठरवण्यात आला. रविवारी दुपारच्या सुमारास वरात खगड़ियाहून बेगुसराय येथे पोहोचली. वरात पोहोचली असता वऱ्हाडी मंडळी डीजेच्या तालावर नाचत असताना एकानं हवेत गोळीबार करण्यास सुरूवात केली. यामध्ये नवऱ्या मुलाचा भाऊ मोहम्मद सद्दामच्या डोक्यालाच गोळी लागल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान त्यांना काडतुसं सापडली. याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या आरोपी मोहम्मद जहांगीरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भावाचा मृत्यू झाल्यानं नवऱ्यामुलानं आपला विवाह थांबवला. संपूर्ण कुटुंबीयांना या घटनेमुळे जबरदस्त धक्का बसला आहे.