निगडी/पुणे : बहुजननामा ऑनलाइन – जुन्या भांडणाच्या रागातून निगडी येथे एका भंगार व्यावसायिकावर दोन गोळ्या झाडून जीवे मारण्याच प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि.20) रात्री बाराच्या सुमारास निगडी येथील सेक्टर क्रमांक 22 मध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
सुरज पवार (वय- 28), प्रशांत रमेश कोळी (वय-32), राहुल सोनकांबळे (वय-28 तिघे रा. निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भारत ज्ञानोबा थोरात (वय-22 रा. आझाद चौक, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भंगाराचा व्यवसाय असून त्यांच्या भावाचे आणि आरोपींचे काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी एका चारचाकी वाहनातून आले. त्यावेळी फिर्यादी हे बिल्डींगच्या खाली मित्र रफिक याच्यासोबत गप्पा मारत उभे होते. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रला, तुम्हाला ठोकतो, गोळ्या घालतो असे म्हणत आरोपी कोळी आणि पवार यांनी त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून त्या दोघांच्या दिशेने दोन गोळ्या फायर केल्या.
गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक भयभीत होऊन आपापल्या घरात निघून गेले. आरोपींनी गोळीबार करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादी भरत थोरात यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके त्यांच्या मागावर पाठवण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.