बहुजननामा ऑनलाइन टीम – वाघोली येथील निलीमा टेक्सटाईलमधून ९५ लाखांच्या कपड्यांसह फरार झालेल्या एकाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने अहमदनगर येथून पकडले ( absconding )असून त्याच्याकडून ४२ लाख ८१ हजार रुपयांच्या कपड्यांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यास पुढील तपासासाठी लोणीकंद पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. सुरेंद्र कुमार सेन (रा. वाघोली) असे पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २ महिन्यांपूर्वी लॉकडाऊननंतर वाघोली येथील निलीमा टेक्स्टाईलमध्ये भागीदारीतून ९५ लाखांच्या कपड्यांच्या मटेरियलसह सुरेंद्र सेन फरार झाल्यानंतर याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास करीत असताना १० लाखांचा ऐवज लोणीकंद पोलिसांनी जप्त केला होता परंतु सुरेंद्र सेन फरार होता.
पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे अहमदनगर येथे दाखल असताना पथकातील किरण कुसाळकर व महेंद्र कोरवी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्याद्वारे या गुन्ह्यातील फरार असलेला सुरेंद्र कुमार सेन याला अहमदनगर येथून ताब्यात घेऊन गुन्ह्यांमधील साड्या, कपडे, ड्रेस मटेरियल इत्यादी प्रकारचा एकूण ४२ लाख ८१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केला आहे. पुढील तपास लोणीकंद चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.