भोसरी/पुणे : बहुजननामा ऑनलाइन – घरावर दगडफेक करणाऱ्याला रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करत शिवीगाळ करणाऱ्या एकाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांना ‘तुझी एका दिवसात वर्दी उतरवतो, तुझी गडचिरोलीला बदली करतो’ अशी धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. ही घटना भोसरी येथील दिघी रोडवर असलेल्या वर्धमान टेरेस येथे शुक्रवारी (दि.1) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
प्रकाश दिगंबर शिंदे (वय-59 रा. अष्टविनायक नगरी, मोर, गोदावरी सदन, पुणे-नाशिक हायवे लगत, चाकण पुणे रोड, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक उत्तम सायस भताने यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री दिघी रोडवर एका घरावर दगडफेक होत असल्याचा फोन नियंत्रण कक्षात आला होता. नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार भोसरी पोलीस ठाण्यातील बिट मार्शल पोलीस कर्मचारी उत्तम भताने हे त्यांच्या सहकार्या समवेत वर्धमान टेरेस येथे गेले.
त्यावेळी आरोपीने बिट मार्शल भताने यांच्या अंगावर धाऊन जात त्यांची कॉलर पकडली. तसेच त्यांना धमकी देत शिवीगाळ केली. तर भताने यांचे सहकारी पोलीस शिपाई तरडे यांना ढकलून देत त्यांना देखील शिवीगाळ केली. आरोपी विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तलावडे करत आहेत.