नवी दिल्ली :बहुजननामा ऑनलाइन – कोरोनाचे (Coronavirus) संकट अद्यापही कायम असून देशभरातील कोरोनाबाधितांची आकडेवारी 83 लाखांचा टप्पा पार केली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 24 हजार 315 लोकांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना मार्चपासून सुट्टी देण्यात आली आहे. पण आता अनलॉकमध्ये काही राज्यातील शाळा सुरु केल्या आहेत.
आंध्रप्रदेशात (Andhra Pradesh ) अनलॉक अंतर्गत शाळा सुरु करण्याची परवानगी दिली. त्यानुसार नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 2 नोव्हेंबरपासून शाळा सुरु झाल्या होत्या. पण कोरोनाच्या संकटात शाळा सुरु करणे या राज्यांना चांगलेच अंगलट आले. राज्यातील जवळपास 262 विद्यार्थी आणि 160 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे (262 students and about 160 teachers tested positive) माहिती समोर आली आहे.
या संदर्भात एका वरीष्ठ अधिका-यांने दिलेल्या माहितीनुसार, 2 नोव्हेंबर रोजी आंध्रप्रदेशमध्ये 9 वी व 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा सुरु करण्यात आल्या. पण मागील तीन दिवसात जवळपास 262 विद्यार्थी आणि 160 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे चाचणी अहवालातून स्पष्ट झाले. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच प्रशासनाच्या चिंतेतही भर पडली आहे.