बहुजननामा ऑनलाईन – बॉक्स ऑफिसवर यश मिळवलेल्या अक्षय कुमारने ९ सप्टेंबर रोजी वयाच्या ५३ व्या टप्प्याला स्पर्श केला. सध्या स्कॉटलंडमध्ये ‘बेलबॉटम’ या पुढच्या चित्रपटाचे चित्रीकरण करत असलेल्या अक्षयच्या नावावर एक असा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे, जो फारच कमी कलाकार बनवू शकतात. हा विक्रम बॅक टू बॅक हिट चित्रपट देण्याचा आहे. अक्षयने तीन वर्षांच्या कालावधीत सलग १२ हिट चित्रपट केले आहेत.
एअरलिफ्टपासून झाली सुरुवात
हिट चित्रपट देण्याची मालिका २०१६ च्या ‘एयरलिफ्ट’ या चित्रपटाने सुरु झाली होती, ज्याने बॉक्स ऑफिसवर १२९ कोटींचे कलेक्शन करून सुपरहिट रेटिंग मिळवले. त्याच वर्षी आलेल्या ‘हाऊसफुल ३’ ने जवळपास १०८ कोटी कलेक्शन केले आणि यशस्वी झाला. १२७ कोटींपेक्षा जास्त कलेक्शन करणारा ‘रुस्तम’ सुपरहिट ठरला. २०१७ मध्ये ‘जॉली एलएलबी २’ (११७ कोटी) आणि ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ (१३३.६० कोटी) हिट ठरले. २०१८ मध्ये पॅडमॅन (७९ कोटी), गोल्ड (१०८ कोटी) आणि २.० (१८८ कोटी) हिट घोषित करण्यात आले.
अक्षयसाठी २०१९ हे वर्ष खूप उत्तम आणि संधी देणारे होते. त्याचे ४ चित्रपट आले आणि चारही हिट ठरले. त्यापैकी काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर द्विशतक केले. त्यात ‘केसरी’ (१५३ कोटी), ‘मिशन मंगल’ (११४ कोटी), ‘हाऊसफुल ४’ (२०६ कोटी) आणि ‘गुड न्यूज’ (२०१ कोटी) या चित्रपटांचा समावेश आहे.
अक्षय तोडणार का राजेश खन्ना यांचा रेकॉर्ड ?
आता प्रश्न हा आहे की, अक्षय कुमार आपले सासरे राजेश खन्ना यांचा अनब्रेकेबल रेकॉर्ड मोडू शकेल का ? हिंदी चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांनी १९६९ ते १९७१ दरम्यान अवघ्या दोन वर्षात सलग १५ हिट चित्रपट दिले होते. हाच तो विक्रम आहे, जो अद्याप अनब्रेकेबल आहे. आजपर्यंत कोणत्याही अभिनेत्याला तो मोडता आलेला नाही. इतकेच नाही तर महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन हेही राजेश खन्नाच्या या विक्रमाशी बरोबरी करू शकले नाही.
आता अक्षयला हा विक्रम मोडण्यासाठी सलग ४ हिट चित्रपटांची आवश्यकता आहे. २०२० मध्ये अक्षय कुमार हा पराक्रम करु शकला असता. त्याचे चार चित्रपट सूर्यवंशी, लक्ष्मी बॉम्ब, पृथ्वीराज आणि बच्चन पांडे प्रदर्शित होणार होते. पण कोविड-१९ मुळे या चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलले. आता डिस्नी प्लस हॉटस्टारवर लक्ष्मी बॉम्ब प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर उर्वरित चित्रपटांबाबत अद्याप स्पष्टता नाही. ते पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.