मुंबई : बहुजननामा ऑनलाईन टीम – ज्येष्ठ आयपीएस अधिकारी नवल बजाज हे केंद्रामध्ये प्रतिनियुक्तीवर जात आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) त्यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. नवल बजाज यांनी प्रतिनियुक्तीच्या आदेशानंतर पोलीस महासंचालक संजय पाडे यांची मंगळवारी (दि.18) भेट घेतली. नवल बजाज हे सध्या अतिरिक्त पोलीस महासंचालक (आर्थिक गुन्हे) आहेत.
आयपीएस अधिकारी नवल बजाज यांची केंद्रात प्रतिनियुक्ती होण्यापूर्वी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल हे CISF मध्ये प्रतिनियुक्तीवर गेले होते. याशिवाय महासंचालक (नागरी सुरक्षा) रश्मी शुक्ला देखील CISF मध्ये प्रतिनियुक्तीवर गेल्या आहेत. त्यापूर्वी मुंबईचे सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी हे प्रतिनियुक्तीवर CBI मध्ये गेले होते. आता नवल बजाज हे देखील CISF मध्ये प्रतिनियुक्तीवर जात आहेत.
दरम्यान, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी केंद्रात जाणे पसंत केले. रश्मी शुक्ला या आधीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या मानल्या जातात. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांची पदोन्नती केली. मात्र महासंचालक (नागरी सुरक्षा) ही साईट पोस्टिंग दिली. पोलीस उपमहानिरीक्षक मनोजकुमार शर्मा हे यापूर्वीच प्रतिनियुक्तीवर CISF मध्ये गेले आहेत.