बहुजननामा ऑनलाईन
पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोना संकट काळामध्ये रुग्णवाहिकेला मागणी वाढल्याने रुग्णवाहिका चालकांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची लुबाडणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दर आकरणाऱ्या रुग्णवाहिकांवर कारवाई करण्यात आली आहे.
कोरोना संकट काळामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांकडून जास्त दर आकारणी करुन नेये अशा सूचना देण्यात आल्या होत्या. तरी देखील मारुती ओमनी रुग्णवाहिका (एमएच 12 डीटी 3158) आणि ट्रॅव्हलर रुग्णवाहिका (एमएच 14 सीडब्ल्यू 0513) या रुग्णवाहिका चालकांनी रुग्णांकडून जास्तीचे पैसे घेतले होते. यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांनी या दोन रुग्णवाहिकांवर कारवाई करण्याचे आदेश पुणे परिवहन कार्यालयाला दिले होते. त्यानुसार परिवहन कार्यालयाने दोन रुग्णवाहिकांवर कारवाई केली आहे. या दोन्ही रुग्णवाहिकांवर मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनुसार कारवाई करण्यात आली आहे.
रुग्णवाहिकेसाठी दर निश्चित
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक आणि वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या संस्थांच्या अडचणी लक्षात घेऊन पुणे आरटीओ प्रशासनाने रुग्णवाहिकेचे दरपत्रक निश्चित केले आहे. व्हॅन स्वरुपातील रुग्णवाहिकेसाठी 500 रुपये आणि 25 किलोमीटरच्या पुढे अंतर गेल्यास मूळ भाड्यात प्रति किलोमीटर 11 रुपये दर आकारण्यात येणार आहे. तर, तासाला 100 रुपये वेटिंगचा दर निश्चित करण्यात आला आहे. व्हॅनहून मोठ्या रुग्णवाहिकेसाठी 600 रुपेये आणि 25 किलोमीटर पुढील अंतरासाठी प्रति किलोमीटरला 12 रुपये द्यावे लागणार आहेत. या रुग्णवाहिकांना तासाला 125 रुपये वेटिंग दर आहे. तसेच, मिनी बससारख्या रुग्णवाहिकांसाठी 900 रुपये आणि 25 किलोमीटर पुढील अंतरासाठी प्रति किलोमीटर 13 रुपये आणि तासाला 150 रुपये वेटिंग दर ठरवण्यात आला आहे. ही देर पुणे जिल्ह्यासाठी लागू करण्यात आले आहेत.
पुणे परिवहन अधिकारी अजित देशमुख यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, रुग्णवाहिकांनी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारल्यास तात्काळ प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथे तक्रार दाखल करावी. या तक्रारीनुसार तात्काळ कठोर कारवाई केली जाईल.