अकोला : बहुजननामा ऑनलाईन – अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी (दि. 31) पोस्को कायद्यान्वये 4 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच विनयभंग प्रकरणात 2 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.
बंटी ऊर्फ रामराव रामकृष्ण वक्ते असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी म्हशीला पाणी पाजण्यासाठी गेली होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या आरोपी वक्ते याने मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणाची तक्रार मुलीने उरळ पोलीसात दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांच्या न्यायालयात दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी बुधवारी झाल्यानंतर या प्रकरणी आरोपीला 2 वर्षांची शिक्षा, 5 हजाराचा दंड, दंड न भरल्यास एक महिन्याच्या अतिरिक्त कारावासाच्या शिक्षेचे प्रावधान केले आहे. तर पोस्को कायद्याच्या कलम 8 अनव्ये 4 वर्षांची शिक्षा, 5 हजार दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी सरकारच्या वतीने ॲड. राजेश अकोटकर यांनी काम पाहिले.