बीड : बहुजननामा ऑनलाईन – वडवणी तालुक्यातील ब्रह्मनाथ तांडा येथील स्वाती राठोड या विद्यार्थिनीने छेडछडीला कंटाळून आत्महत्या केल्याच्या गुन्ह्यात अद्याप एक आरोपी फरार असून त्याला तात्काळ अटक करुन प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे या मागणीसाठी शहरातील आंबेडकर चौक येथे बंजारा समाजाच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला. यामुळे दुतर्फा वाहतूक खोळंबली होती.
१८ जानेवारी रोजी ब्रम्हनाथ तांडा येथील नववीच्या वर्गात शिकणारी स्वाती गोंविद राठोड हिने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली होती. फरार आरोपीस अटक करावी, खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी करुन आंबेडकर चौक येथे तासभर रस्ता रोको आंदोलन करुन स्वातीला न्याय देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महासचिव प्रा. पी.टी.चव्हाण, शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष अजय दाभाडे, बी.एम. पवार, राम पवार,आप्पासाहेब चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, रोहिदास चव्हाण, युवराज जाधव, पवन चव्हाण, विजय पवार, विष्णू राठोड, गणेश चव्हाण, विनायक चव्हाण, नवनाथ राठोड, प्रेमदास राठोड, शरद राठोड यांच्यासह बंजारा समाजातील महिला व पुरुषांची मोठी उपस्थिती होती. यावेळी सहायक निरीक्षक राजारात तडवी यांना विद्यार्थिनींच्या हस्ते निवेदन देण्यात आले.