बीड : बहुजननामा ऑनलाईन – बीडमधून खळबळजनक घटना समोर आली आहे. बीड शहरातील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यावर तलावारीने वार केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पदाधिकारी जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णलयात उपचार सुरू आहेत. राहुल फरताळे असं या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. बीड शहरात सारडा सर्कलजवळ आज दुपारी ही घटना घडली.
राहुल फरताळे सारडा सर्कलजवळ उभे होते. यावेळी काही अज्ञातांनी राहुलच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. यानंतर त्यांच्यावर तलवारीने वार करण्यात आले. यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. या घटनेनंतर अज्ञातांनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
राहुल फरताळे हे बीड शहरातील खडकपुराचे रहिवासी असून युवासेनेचे विधानसभाप्रमुख आहेत. आज दुपारी ते डीपी रोडवरून सुभाष रोड कडे जात होते. ते बुलेटवरून(क्र एमएच 44 एम -4042) जात असताना 3 जणांनी त्यांना रस्त्यात अडवलं. यानंतर त्यांच्यावर तलवारीने वार करण्यात आले. त्यांची गाडी फोडून मोबाईल आणि सोन्याची चैनदेखील काढून घेण्यात आली. यानंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या डोक्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावरील हल्ल्याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दुपारी उशीरापर्यंत याची पोलिसांत नोंद झाली नव्हती. हल्लेखोरांचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण परसले आहे.
याबाबत बोलताना पोलीस म्हणतात- ‘हल्ला झालाच नाही’
“राहुल फरताळेवर तलवारीने हल्ला झाला नाही. तो त्याच्या व्यवहारातून घरी गेला होता. त्या ठिकणी शिवीागाळ झाली. झटापटीत त्याला कात्री लागली. तो स्वत: पोलीस ठाण्यात आला होता. पोलिसांनी त्याला रुग्णालयात पाठवलं.” असं एक अधिकारी सांगतो. परंतु आपल्यावर तलवारीने हल्ला झाला आहे असं फरताळे सांगतात त्यामुळे सत्य नेमकं काय आहे असा प्रश्न समोर येत आहे.