बहुजननामा ऑनलाईन टीम : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील (CBI) वरिष्ठ अधिकार्यांमध्ये झालेल्या वादानंतर वर्षभराच्या तपासानंतर यंत्रणा अनेक वरिष्ठ अधिकार्यांमध्ये फेरबदल करण्याच्या तयारीत आहे, अशी महिती सूत्रांनी दिली आहे. या घटनाक्रमाशी संबंधित एका वरिष्ठ सीबीआय सूत्राने सांगितले की, वरिष्ठ अधिकार्यांमधील हे फेरबदल पुढील आठवड्यात दिसून येतील. त्यांनी सांगितले की, यंत्रणेने संयुक्त संचालक आणि पोलीस उपमहानिरीक्षक स्तरावरील अधिकार्यांची यादी तयार केली आहे, जे विभागात अनेक वर्षांपासून एकाच पदावर आहेत.
सीबीआयच्या एका अन्य सूत्राने सांगितले की, या बदल्या सरकारच्या नियमित कामकाजाच्या भाग आहेत. या बदल्यांमधून कोणत्याही अधिकार्यावर निशाणा साधण्यात आलेला नसून त्या पूर्णपणे निष्पक्ष आहेत. मागील काही आठवड्यात सीबीआयने पोलीस अधीक्षक, उप अधीक्षक, निरीक्षक आणि उप निरीक्षक पदावरील अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत, जे अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत होते. सूत्रांनी हे सुद्धा सांगितले की, सहाय्यक संचालक प्रवीण सिन्हाच्या नेतृत्वाखाली एक टीम सीबीआयचे संचालक ऋषि कुमार शुक्ला यांच्या शिफारसीनुसार सीबीआयची गुन्हे नियमावली अद्ययावत करत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, नव्या गुन्हे नियमावलीत आता महत्वपूर्ण बदलांचा समावेश करण्यात येत आहे, भ्रष्टचारविरोधी अधिनियम आणि गुन्हेगारी प्रक्रिया संहिता, या दोन्हीमध्ये 2018 मध्ये दुरूस्ती करण्यात आली आहे. यात सायबर गुन्ह्यांवरही लक्ष केंद्रीत केले जाईल. नियमावली शेवटच्या वेळी 2005 मध्ये अद्ययावत करण्यात आली होती, त्यानंतर गुन्ह्यांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. नियमावलीतून एजन्सीला अन्य यंत्रणांशी समन्वय साधणे आणि आपल्या तपासात कोणत्याही प्रकारच्या समस्यांना दूर करण्यासाठी, समन्वय साधण्यासाठी निर्धारित प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत होणार आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये तत्कालीन संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यामधील वाद सार्वजनिक झाला होता. यामुळे सरकारला हस्तक्षेप करावा लागला होता, आणि दोन्ही अधिकार्यांची विभागाच्या बाहेर बदली करावी लागली होती.
Visit : bahujannama.com