बहुजननामा ऑनलाईन टीम : आपल्या देशात दररोज कोणत्या ना कोणत्या पदासाठी निवडणूक होतच असते, परंतु, सध्या राजस्थानच्या सीकरमधील एक निवडणुकीतील उमेदवार सध्या खुपच चर्चेत आहे. ही चर्चा होणे स्वाभाविक आहे, कारण येथील निवडणूक रिंगणात उतरलेल्या एका उमेदवाराचे वय समजले तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. सीकरमध्ये एक 97 वर्षीय वृद्ध महिला निवडणुकीच्या मैदानात उरतली आहे. 97 वर्षांच्या आजीबाई विद्या देवी ग्राम पंचायत निवडणुकीत आपले नशीब अजमावत आहेत. यामुळे त्या सध्या चर्चेच्या विषय झाल्या आहेत. सीकरच्या नीमका परिसरात पहिल्या टप्प्यातील सरपंच निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे.
तर दुसरीकडे 97 वर्षांच्या विद्या देवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून आता निवडणूक प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यांचे पती मेजर शिवराम सिंह हे सुद्धा 55 वर्षांपूवी बिनविरोध सरपंच म्हणून निवडून आले होते. विद्या देवी यांचे सासरे सूभेदार सेडूरामसुद्धा वीस वर्षे गावाचे सरपंच होते. आता सामान्य महिलांसाठी आरक्षण लागल्याने विद्या देवी मैदानात उतरल्या आहेत. या आजीबाईंचा नातू सीकरमध्येच वॉर्ड क्रमांक 25 मधून जिल्हा परिषद सदस्य आहे. विद्या देवी या राजस्थानच्या अशा पहिल्या महिला आहेत ज्या या वयात निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या आहेत. परंतु, त्यांचा जोष तरूणांसारखाच असल्याचे दिसून येत आहे.
विद्या देवींसाठी त्यांचे नातेवाईक नव्हे तर त्या स्वत: गावात जाऊन मत मागत आहेत. त्यांची लढत याच भागातील सुमन देवी यांच्याशी होणार आहे, ज्या विद्यमान सरपंच आहेत. विद्या देवींसोबत अन्य तीन महिलाही निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांची नावे झनकोरी देवी, विमला देवी आणि आरती मीणा अशी आहेत. सामान्य महिलांसाठी राखीव या पुरानाबासच्या जागेसाठी अटीतटीची लढत होत आहे. या मतदार संघात 11 वार्ड आहेत. ज्यामधील नऊ सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. बाकीच्या ठिकाणी निवडणूक होत आहे. निवडणुकीबाबत विद्या देवी म्हणाल्या, गावच्या विकासात पती आणि सासर्यांचे मोठे योगदान आहे, आणि निवडणूक लढवून मी त्यांची परंपरा पुढे घेऊन जाणार आहे.
Visit : bahujannama.com