नाशिक: Dwarka Doke | आईवडिलांना श्रद्धांजली अर्पण करण्यासह महाराष्ट्र पोलिस दलाचा ध्वज फडकावण्यासाठी महाराष्ट्र पोलिस अकादमीतील (Maharashtra Police Academy) पोलिस निरीक्षक द्वारका विश्वनाथ डोके यांनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. त्यांच्या या कामगिरीबाबत विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.
सन २०२२ मध्ये पहिल्या प्रयत्नात एव्हरेस्टच्या अंतिम टप्प्यावर पोहोचल्यावर त्यांना शारीरिक त्रास झाला. त्यामुळे मोहीम अपूर्ण राहिल्याने त्यांनी सन २०२३ मध्ये महाराष्ट्र पोलिस अकादमीत अधिक सराव केला.
अखेरीस २४ मार्च २०२४ रोजी त्या काठमांडू येथे पोहोचल्या. तेथील लकपा शेरपा यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी एव्हरेस्ट चढण्यास सुरुवात केली. पासंग शेरपा हे त्यांच्या मदतीला होते. २२ मे रोजी पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी त्यांनी एव्हरेस्ट शिखरावर पोहोचून तिरंगा व महाराष्ट्र पोलिस दलाचा ध्वज फडकावला. यासह आईवडिलांना श्रद्धांजली वाहिली.
एव्हरेस्ट मोहीम फत्ते करणाऱ्या राज्य पोलिस दलातील त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. वयाच्या ४९ व्या वर्षी डोके यांनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. त्यांची मोठी बहीण मुंबई पोलिसांत निरीक्षक पदावर कार्यरत आहे.
सोमवारी (दि. २७) मूळ गावी अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये द्वारका डोके यांचे जंगी स्वागत करण्यात आहे. त्यांच्या या कामगिरीबाबत आता कौतुक केले जात आहे.
सन २००६ मध्ये सरळ सेवा उपनिरीक्षक परीक्षेतून महाराष्ट्र पोलिस दलात द्वारका डोके रुजू झाल्या. त्या सध्या नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत सहायक संचालक पदावर कार्यरत आहेत. सन २०२२ मध्ये वाचनातून त्यांना एव्हरेस्ट शिखर सर करण्याची इच्छा झाली. दिवंगत आईवडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी एव्हरेस्ट शिखर चढण्याचा निश्चय केला होता.