कराची : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील दोन वेगवेगळ्या भागात संशयित अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये पाच पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य दोन जखमी झाले. फ्रंटियर कॉर्पच्या सैनिकांना लक्ष्य करीत बलुचिस्तानची राजधानी क्वेटाच्या बाहेरील भागात आणि कोहलू जिल्ह्याच्या दुर्गम भागात गुरुवारी हल्ला करण्यात आला.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहिला हल्ला क्वेटाच्या बाहेरील बायपास भागात झाला. येथे मोटारसायकलमध्ये रिमोट ऑपरेट बॉम्ब ठेवून फ्रंटियर कॉर्प्सच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले होते, त्यात एक सैनिक ठार तर दोन जण जखमी झाले. ते म्हणाले की, गस्त घालणाऱ्या फ्रंटियर कॉर्पच्या वाहनाजवळ हा स्फोट झाला.
अंदाधुंद गोळीबाराला सैनिकांनीही दिले प्रत्युत्तर
कोहलू जिल्ह्यातील कहाण भागात हा दुसरा हल्ला झाला, जिथे संशयित अतिरेक्यांनी फ्रंटियर कॉर्पच्या चौकीला गुरुवारी रात्री लक्ष्य केले यात चार सैनिक ठार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले, “सशस्त्र हल्लेखोरांनी चेक पोस्टवर अंदाधुंद गोळीबार केला, ज्याला सैनिकांनीही प्रत्युत्तर दिले.’
दरम्यान, चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) चे केंद्र असणाऱ्या बलुचिस्तानमध्ये दहशतवादी आणि फुटीरतावादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे आणि अलिकडच्या काळात सुरक्षा दलांवरील हल्ले वाढले आहेत. 15 फेब्रुवारी रोजी कच्छच्या दुर्गम भागात असलेल्या फ्रंटियर कॉर्पच्या एका चौकीलाही लक्ष्य करण्यात आले होते, ज्यात एक सैनिक ठार झाला आणि दुसरा जखमी झाला.