राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना आता आणखी एका मंत्र्याचे प्रेम प्रकरण चर्चेत आले आहे. मात्र, हा मंत्री कोण हे अद्याप समजू शकले नसले तरी मुलीने आत्महत्या केल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. बीड जिल्ह्यातील 22 वर्षीय तरुणीने विदर्भातील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबधातून आत्महत्या केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून, या मुलीचे फोटो आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
व्हायरल होत असलेल्या ऑडीओ क्लिपमधील संवादामध्ये तरुणीवर उपचाराच्या बाबतीत बोलले गेले असून तिच्यावर नेमके कोणते उपचार सुरु होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पूजा लहू चव्हाण (वय-22 रा. हेवन पार्क, महमंदवाडी, मूळ रा. परळी, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पूजाने बीएचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या कोर्ससाठी आली होती. ती चुलत भाऊ आणि एका मित्रासोबत रहात होती. पुण्यात आल्यानंतर दोनच आठवड्यात तिनं टोकाचं पाऊल उचललं. तीने रहात असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली.
दरम्यान, पुजा चव्हाण (वय-22) तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर ही नक्की आत्महत्या आहे की हत्या ? याची चौकशी व्हावी अशी मागणी भाजपच्या महिला आघाडीने केली आहे. या बाबतची तक्रार वानवडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. बुधवारी (दि.10) महिला आघाडीच्या सदस्यांनी पोलीस आयुक्त पुणे शहर यांना निवेदन देवून सर्व प्रकाराची सखोल चौकशी व्हावी आणि सदर प्रकरणातील गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करुन त्यांच्यावर कठोर शासन करावे, अशी मागणी केली आहे.