बहुजननामा ऑनलाईन – मंगळवारी सिक्किमच्या डेमोक्रॅटिक पार्टी (SDF) चे १० आमदार भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झाले. माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांच्यासह अन्य ४ आमदारांना वगळता उर्वरित सर्व आमदार दिल्लीत आले आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपाचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा आणि सरचिटणीस राम माधव यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व मिळवून दिले. सिक्कीममध्ये भाजपने आपले खाते अजून उघडले नव्हते, परंतु SDF च्या १० आमदारांनी पक्षात प्रवेश घेतल्यानंतर भाजपची ताकद वाढली आहे.
सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटने सिक्कीमवर २५ वर्षे राज्य केले. सिक्कीम विधानसभा २०१९ च्या निवडणुकीमध्ये पवन कुमार चामलिंग यांच्या पक्षाचे १५ आमदार विजयी झाले. त्याचवेळी भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. पण १५ पैकी १० आमदार पक्षात आल्यामुळे भाजप एकाच झटक्यात शून्यावरून १० वर गेला आहे.
पवन चामलिंग यांनी १९३३ मध्ये एसडीएफची स्थापना केली. १९९४, १९९९, २००४, २००९, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाने पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले. तसंच २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एसडीएफला पराभवाला सामोरे जावे लागले. राज्यात सिक्कीम क्रांतिकारी (एसकेएम) चे राज्य आहे. प्रेमसिंह तमंग हे तेथील मुख्यमंत्री आहेत.