बुलडाणा : बहुजननामा ऑनलाइन – न्याय मिळत नसल्याची ओरड करत एका शेतकऱ्याने पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच पकडल्याने अनर्थ टळला. या घटनेने पोलिसांची चांगलीच धांदल उडाली.
विजय ईश्वरसिंग चव्हाण असे या शेतकऱ्याचे नाव असून तो तालुक्यातील तारापूरचा रहिवासी आहे. काही महिन्यांपूर्वी शेतकरी विजय चव्हाणने त्याचा मामा शेरसिंग साबळे (रा. लोणघाट, ता. मोताळा) याला बैलजोडी विकली होती. मात्र मामा पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने विजय चव्हाणने बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी शेरसिंग साबळेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, न्यायालयाने साबळे यास जामीन मंजूर केला. आपल्याला न्याय मिळाला नाही म्हणत बुलडाण्यात आलेल्या विजय चव्हाणने पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. दुपारी त्याने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच त्याला पकडल्याने पुढील अप्रिय घटना टळली. त्याला तातडीने सामान्य रुग्णालयात नेण्यात आले.
४४ हजार रुपयांमध्ये मामाला बैलजोडी विकली होती. १०० रुपये सौदा देऊन व्यवहार पक्का करण्यात आला होता. १० हजार रुपये देऊन उर्वरित पैसे सहा महिन्यांनंतर देण्याचे ठरले होते, असे शेतकऱ्याने सांगितले.