‘अब की बार’ स्थापन करणार शेतकरी सरकार… 

January 26, 2019
किसान, जवान व मजदूर आघाडी लढवणार ४८ जागा

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचबरोबर हे सरकार शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचे नुसते आश्वासनच देत आहे. त्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार देखील केला जात नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन किसान, जवान व मजदूर आघाडीने महाराष्ट्रात ४८ जागा लढवण्याचा निर्णय घेतला असून अब की बार शेतकरी सरकार स्थापन करणार, अशी माहिती शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी किसान, जवान व मजदूर आघाडीचे अध्यक्ष गणेश जगताप, सत्यशोधक शेतकरी समाज प्रमुख किशोर ढमाले, बळीराजा शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष संजय घाटणेकर, कालिदास आपटे, दिलीप भोयर, बी. जी. पाटील आदींची उपस्थिती होती. महाराष्ट्रातील ११ संघटना एकत्र येऊन किसान जवान व मजदूर आघाडी या राज्यव्यापी आघाडीची स्थापना केली असून . यात ४८ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे यापैकी २० जागेवर प्राथमिक स्वरूपात चर्चा झाली आहे. तर आघाडीच्या वतीने काँग्रेस व भाजपा युती यांच्या विरोधात लढू इच्छिनाऱ्या सपा, बसपा व वंचित बहुजन आघाडी आदी पक्षांशी चर्चा करून ४८ जागांचे नियोजन केले जाणार आहे.