चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाइन – जाती-जातीत व धर्मा-धर्मात आपण सर्व विभाजीत झालेलो आहोत. म्हणून सर्व जातीधर्माच्या लोकांनी एकत्र यावे व एक होऊन आनंदी व सुखी राहावे म्हणून वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थना तयार केली. श्री गुरूदेव सेवा मंडळ ऊर्जानगरच्या वतीने कामगार मनोरंजन केंद्र येथे वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ५० व्या व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांच्या ६२ व्या स्मृतिदिनानिमित्य सर्वधर्मिय सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना ठिक ४ वाजून ५८ मिनिटांनी उपस्थितांनी मौन श्रद्धांजली व आदरांजली वाहिली. यापूर्वी एक तास श्रद्धांजलीपर भजन सादर करून वातावरण निर्मिती करण्यात आली. सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनेत मुस्लिम धर्माचे अख्तर खान, ख्रिश्चन धर्माचे सुमंत जेनेकर, हिंदू धर्माचे बबनराव भोयर, बौद्ध धर्माचे मारोती साव, जैन धर्माचे किशोर हनुमंते व शिवधर्माचे संजय जुनारे आदी सहभागी झाले होते. सर्वांनी आपआपल्या धर्माची प्रार्थना सादर करून त्यांचे महत्व विशद केले. या सर्वधर्मिय व सामुदायिक प्रार्थनेचे संचालन आणि श्रद्धांजलीचे निवेदन श्री गुरूदेव सेवा मंडळाचे सेवक राधेश्याम राऊत यांनी केले. तर हार्मोनियम वादक राजेंद्र पोईनकर, तबला वादक प्रशांत दुर्गे, ऑर्गन वादक मंगेश कुरेकार, गायक सदाशिव आघाव, गायिका शोभना शेख, गजेंद्र पाटोळे, राजेंद्र लांडे, बंडू कुळमेथे, मारोती पिदुरकर, शंकर दरेकर यांनी साथसंगत केली. देवराव कोंडेकर, मुर्लीधर गोहणे, विलास उगे, मुक्ता पोईकर, सुनंदा कन्नमवार यांनी नियोजनाकरिता सहकार्य केले. ‘सर्वधर्माचा समन्वय, विश्वशांतीचा उपाय, लोकसुधारणेचे विद्यालय सामुदायिक प्रार्थना’ अशा महान सामुदायिक प्रार्थनेवर भूवैकुंठ अड्याळ टेकडीचे संचालक सुबोधदादा यांनी मार्गदर्शन केले.
सर्वधर्मिय प्रार्थनेत सहभागी झालेल्या वेगवेगळया धर्माच्या सेवकांचा याप्रसंगी शाल व स्मृतिचिन्ह देऊन सुबोधदादांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रार्थनेसाठी मंडळाचे पदाधिकारी, सभासद व वसाहतीतील महिला-पुरूष व मोठ्या संख्येने गुरूदेवप्रेमी सहभागी झाले होते.