मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – चक्कर येवून रेल्वे ट्रॅकवर कोसळलेल्या २३ वर्षीय तरुणीचा जीव आरपीएफ पोलिसाने प्रसंगावधान दाखवून वाचवले. गुरुवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास सँडहर्स्ट रोड स्थानकात हा प्रकार घडला. हा सगळा थरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
काही प्रवासी सँडहर्स्ट रोड स्थानकात लोकल ट्रेनची वाट पाहत उभे होते. २३ वर्षीय अनीशा शेख ही लोकलची वाट पाहत उभी होती. लोकल समोरुन येत असताना अनिशाला चक्कर आली आणि ती ट्रॅकवर जाऊन कोसळली. प्रवाशांमध्ये एकच गोंधळ सुरु झाला. लोकल येत असल्याने तरुणी त्याच्याखाली जाईल या भीतीने प्रवासी हात दाखवून मोटरमनला लोकल थांबवण्याचा इशारा करत होते. तेव्हा तिथे कर्तव्यावर तैनात असलेल्या रेल्वे कॉन्स्टेबल श्याम सुरत यांनी धाव घेतली. त्यांनी थेट ट्रॅकवर उडी मारली आणि प्रवाशांच्या मदतीने तरुणीला प्लॅटफॉर्मवर आणलं आणि जीव वाचवला. श्याम सुरत यांनी प्रसंगावधान दाखवत धाव घेतली आणि तरुणीचा जीव वाचवला.