पुणे : बहुजननामा ऑनलाइन – भरधाव वेगात जाणाऱ्या मद्यधुंद (drunken Car Drive) कार चालकाने एका दुचाकीला जोरदार धडक (hit) दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी (Seriously Injured) झाले आहेत. हा अपघात आज (गुरुवार) सायंकाळी सहाच्या सुमारास सिंहगड रोडवरील गोऱ्हे बुद्रुक येथील राज हॉटेलच्या समोर झाला. अपघातात जखमी झालेल्या दुचाकीवरील दोघांना उपचारासाठी नवले रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
विनोद कुमार रझ्झाक आणि इमरान अब्दुल्ला शेख (रा. नांदेड, ता. हवेली) अशी दुचाकीवरील जखमी झालेल्या दोन व्यक्तींची नावे आहेत. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर आकाश बंडगर आणि गणेश म्हेत्रे (रा. सोमवार पेठ) अशी कारमधील दोघांची नावे आहे. यापैकी आकाश हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. दुचाकीला धडक देऊन घटनास्थळावरुन पळून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, गोऱ्हे बुद्रुक येथील तरुणांनी त्यांना डोणजे फाट्याजवळ गाठले आणि त्यांना पुन्हा घटनास्थळी घेऊन आले.
पोलीस अधिकाऱ्यांनी गाडीतून उतरण्याच तसदी घेतली नाही
अपघात झाल्यानंतर काही वेळातच या ठिकाणी हवेली पोलीस ठाण्याची गाडी आली. गाडीत वरिष्ठ अधिकारी बसले होते. अपघातामुळे रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. जखमी झालेले दोघे रस्त्याच्या कडेला विव्हळत पडलेले होते. मात्र, गाडीत बसलेल्या अधिकाऱ्यांना याची दया आली नाही. त्यांनी गाडीतून खाली उतरून पाहणी करण्याची तसदी देखील घेतली नाही. पोलीस गाडीचे चालक आणि एका होमगार्डने खाली उतरुन जखमींना रुग्णवाहिकेत बसवून अपघाताची माहिती घेतली.