बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना संकटकाळात नागरिकांना वेळेत वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, रुग्णांवर तातडीने उपचार, परिसर स्वच्छता, सरकारच्या नियमांचे पालन करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करणे आदी आरोग्याच्या दृष्टीने उल्लेखनीय कामगिरी(Award for Excellence) केल्याबद्दल पुण्यातील पुणे, खडकी आणि देवळाली कँटोन्मेंट बोर्डाला संरक्षण मंत्री ‘अॅवॉर्ड फॉर एक्स्लन्स’ने गौरविण्यात आले.
दिल्ली येथे संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण मालमत्ता विभागातर्फे आयोजित केलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात विभागाच्या महासंचालक दीपा बाजवा यांच्या हस्ते ‘अॅवॉर्ड फॉर एक्स्लन्स’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पुणे कँटोन्मेंट बोर्डातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार, खडकी कँटोन्मेंट बोर्डातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार यांनी हे पुरस्कार स्वीकारले.
दरवर्षी संरक्षण मालमत्ता विभागातर्फे शिक्षण, आरोग्य, रुग्णालयीन कामकाजात सुधारणा, नोंदींचे व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन आदी विविध वर्गवारीत कँटोन्मेंट बोर्डांना पुरस्काराने गौरविण्यात येते. कोरोनाच्या संकटकाळात तिन्ही कँटोन्मेंट बोर्डांनी आरोग्याच्या आघाडीवर उल्लेखनीय काम केले आहे. परिणामी करोना मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात असून, करोनामुक्तांचे प्रमाण वाढले आहे.