बहुजननामा ऑनलाईन टीम – आज सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यास नकार दिला आहे. मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारला हा आणखी एक धक्का मिळाला आहे. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने दिलेली अंतरिम स्थगिती दिल्याने नोकरभरती देखील रखडली होती. त्यात स्थगितीपूर्वीच्या नोकरभरतीलाही परवानगी सुप्रीम कोर्टाने नाकारली आहे. यावेळी, मराठा आरक्षणावरील स्थगिती तूर्तास कायम ठेवत २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी सुरू होणार असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. सध्या मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाचं प्रकरण हे गंभीर आणि मोठं आहे. त्यामुळे याबाबत विस्तृत सुनावणीच केली जाईल, असं कोर्टाने यावेळी नमूद केलं आहे. मराठा आरक्षणावरील स्थगितीमुळे विद्यार्थ्यांचं आणि नोकर भरतीबाबत होत असलेल्या नुकसानीचा विषय अॅड. मुकूल रोहतगी यांनी कोर्टासमोर उपस्थित केला. त्यावर कोर्टाने आम्ही कोणतीही भरती थांबविण्यास नकार दिलेला नाही. पण मराठा आरक्षणानुसार ही भरती करता येणार नाही, असं म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने बाजू मांडताना सरकारी वकिलांनी विविध उदाहरणं देऊन मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्याची विनंती सुप्रीम कोर्टाकडे केली. पण सध्या या प्रकरणात कोणतीही सुनावणी देण्यास सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे नकार दिला.