नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने सर्वसामान्यांना झटका देत 1 एप्रिल 2021 पासून लहान बचत योजनांमध्ये व्याजकपात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी ट्विट करून हा आदेश चुकून निघाल्याचे सांगत व्याजदर जैसे थे राहतील असे स्पष्ट केले आहे. त्यानंतर एका ट्विटर युजर्सने शेअर केलेली बातमी पाहून भाजपा नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आश्चर्य व्यक्त करत मोदी सरकारला खोचक टोमणा लगावला आहे.
आश्चर्य ! हा केवळ अर्थमंत्र्यांचा प्रॉब्लेम आहे की, संपूर्ण मंत्रिमंडळाच ? असा टोमणा स्वामी यांनी ट्विटरवरुन त्या युजर्संला टॅग करुन विचारला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या आधीच्या निर्णयानुसार बचत खात्यातील रकमेवरील व्याजदर 4 टक्क्यांवरून 3.5 टक्क्यांवर केला होता. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफवरील वार्षिक व्याजदर 7.1 टक्क्यांवरून 6.4 टक्के केला होता.
1 वर्षाच्या कालावधीसाठी बॅकेत ठेवलेल्या मुदत ठेवीवरील व्याजदर हा तिमाहीला 5.5 टक्क्यांवरून 4.4 टक्क्यांवर करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या बचत योजनांवरील व्याजदरातही कपात केली होती. मात्र सोशल मीडियातून या निर्णयाला विरोध पहायला मिळाला. त्यानंतर, आज सकाळी अर्थमंत्र्यांनी ट्विट करुन कालचा व्याजदर कपातीचा निर्णय मागे घेत असल्याचे स्पष्ट केले आहे.