बहुजननामा ऑनलाईन – आयुष्यात चांगला व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करूनही नेहमी अपयश हाती येत असल्याने तसेच अभ्यासाच्या तणावातून बारावीत शिकणाऱ्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने भिंतीवर आत्महत्या करण्यापूर्वीच इंग्रजीमध्ये सुसाईट नोट लिहून ठेवल्याचे आढळून आले. या आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव गुरुप्रसाद रामप्रसाद घाडगे (वय १८) असे आहे. हा युवक योगेश्वरीनगरी मधील रहिवासी होता. तर गुरुप्रसादचे वडील हे अंबाजोगाई येथील एका शाळेत शिक्षक आहेत. गुरुप्रसादच्या दोन्ही बहिणींचे लग्न झाले असून घरात तो आणि आई वडील असे तिघेच राहत होते.
योगेश्वरी महाविद्यालयात बारावीच्या वर्गात गुरुप्रसाद शिकत होता. मागील अनेक दिवस तो अभ्यासाच्या तणावाखाली होता. त्याच्या आईची ताब्यात ठीक नसल्याने बुधवारी दुपारी त्या दवाखान्यात गेल्या होत्या. तर वडील शाळेत गेले होते. गुरुप्रसाद नेहमी प्रमाणे महाविद्यालय आणि त्यानंतर क्लासला जाऊन दुपारी ४ च्या सुमारास घरी आला. त्यानंतर त्याने आपल्या खोलीचा दरवाजा लावला. आणि भिंतीवर आई- वडिलांसाठी संदेश लिहून त्यांनी दोरीने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.
सायंकाळी ७ वाजता आई – वडील घरी आल्यानंतर त्यांनी कित्येकदा गुरुप्रसादला आवाज दिला मात्र त्याने काही प्रतिसाद न दिल्याने त्यांना दरवाजा तोडावा लागला. आणि त्यानंतर समोरचा दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. गुरुप्रसाद याने भिंतीवर ‘आय क्विट ‘ असे लिहीले होते. या जगात राहण्याचा आपण विचार करतो .पण त्यापेक्षा हे कितीतरी अधिक अवघड असते. मी नेहमीच एक चांगला व्यक्ती बनण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक वेळी मी अयशस्वी ठरलो. मॉम, डॅड . . . . . मी तुमचा चांगला मुलगा होऊ शकलो नाही, मला माफ करा, या परिस्थितीत मी जगू शकत नाही. आय क्विट. असा संदेश गुरुप्रसादने भिंतीवर लिहिला होता. या प्रकरणी बीड पोलीस अधिक तपास करीत आहेत.