आळेफाटा : बहुजननामा ऑनलाईन – एका जेष्ठ महिलेचा खून करून दागिने लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी 24 तासाच्या आत नाशिक येथून अटक केली. चोरलेला मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी दिली आहे. जुन्नर तालुक्यातील साकोरी येथे शुक्रवारी (दि. 4) ही घटना घडली होती.
जानकुबाई अर्जुन चोरे (वय 65, रा साकोरी चोरे मळा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. अर्जुन शुभनारायण प्रसाद (वय 27 मुळ रा खबशी ता बनीयापुर छप्रा जि सारंग राज्य बिहार) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानकुबाई चोरे यांना शुक्रवारी (दि. 4) सकाळी दहाच्या सुमारास आरोपी अर्जुन शुभनारायण प्रसाद याने सेंट्रीगच्या कामाकरिता दुचाकीवरून बसून तो राहत असलेल्या खोलीत आणले. यावेळी त्याने तीक्ष्ण हत्याराने चोरे यांच्या डोक्यावर वार करून त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले आणि संशय येऊ नये म्हणून घरास कुलुप लावून पसार झाला. सायंकाळी जानकुबाई घरी न आल्याने नातेवाईकांनी बाम्हणमळा येथील अर्जुन प्रसाद राहत असलेल्या घरी जाऊन पाहिले असता घराला कुलुप होते. खिडकीतून आत डोकावून पाहीले असता त्यांना आतमध्ये जानकुबाई चोरे या मृतावस्थेत दिसल्या. आळेफाटा पोलिसांनी याप्रकरणी अर्जुन प्रसाद याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीकडील मोबाईल लोकेशनचा अंदाज घेत नाशिक रेल्वेस्थानकातून अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर पवार करत आहेत.