नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल वोरा (Motilal Vora) याचे निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महत्वाची बाब म्हणजे वोरा यांनी कालच 93 वा वाढदिवस आपल्या कुटुंबियांसोबत साजरा केला होता. त्यांनी दोन वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रीपद भुषवले होते. वोरा यांच्या निधनामुळे कॉंग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे.
मोतीलाल वोरा हे गांधी कुटुंबियांच्या अतिशय जवळचे मानले जातात. ते उत्तर प्रदेशचे राज्यपाल देखील राहिले आहेत. काँग्रेस पक्षाच्या खजिनदारपदावर ते तब्बल 17 वर्ष कार्यरत होते. वाढते वय आणि प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी खजिनदार पदातून मुक्त करण्याची विनंती काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 2018 मध्ये केली होती. वोरा यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या खजिनदारपदाची जबाबदारी अहमद पटेल यांच्याकडे दिली गेली. त्यांचेही 25 नोव्हेंबर रोजी निधन झाले आहे.