नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होत आहे आणि रिकव्हरी रेटही वाढत आहे हे लक्षात घेता आता जिल्ह्यातील शाळा 4 जानेवारी 2021 पासून सुरू करणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे. इतकंच नाही तर 9 ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
शहरातील शाळा व महाविद्यालयाला तयारीच्या सूचना
शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीनंतर छगन भुजबळ याबाबत बोलताना म्हणाले, ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याबाबत प्रशासन अनुकूल आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातील इयत्ता 9 वी ते 12 वी चे वर्ग सुरू करण्याबाबत पुढील बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यापूर्वी मुंबई, ठाणे आणि पुणे येथील प्रशासन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेते, याचाही आढावा घेतला जाईल. दरम्यान शाळा सुरू होणार असल्यानं शैक्षणिक संस्था, विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय यांना तयारी संदर्भात आवश्यक सूचना केल्या जात आहेत. यात प्रामुख्यानं शिक्षकांची आरोग्य तपासणी, शालेय प्रांगणाची स्वच्छता, निर्जंतुकीकरण तसंच अन्य तयारी करण्यासंदर्भात सुचवले आहे.
इतर इयत्तांबाबत निर्णय नाही
पुढं बोलताना ते म्हणाले, 9 वी ते 12 वी व्यतिरिक्त इतर इयत्तांबाबत कुठलाही निर्णय सध्या घेतला गेलेला नाही. केंद्र आणि राज्य पातळीवर याबाबत धोरण ठरल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं.