मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अंबानीच्या घराजवळ स्फोटक सापडल्याप्रकरणी एनआयएने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली आहे. या प्रकरणात एनआयएने वाझे यांच्या कार्यालयातून 200 पानांची एक डायरी जप्त केली आहे. या डायरीतून त्याचे आर्थिक व्यवहार व वसुलीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. डायरीत पब्ज, बार, बुकी आणि इतर महत्त्वाच्या कारवायांचा उल्लेख आहे. तसेच लाखाच्या नोंदीसाठी एल, तर हजाराच्या नोंदीसाठी के अक्षर वापरले आहे. बार, पब, हुक्का पार्लर यांची येणारी रक्कम आणि दिलेली रक्कमही लिहिली आहे. पैशांचे वाटप नियमित होत होते. त्याबाबतही कोड भाषेत तपशील नमूद असल्याचे एनआयच्या अधिका-यांनी सांगितले.
एनआयएने सचिन वाझेला 13 मार्चला अटक केली. त्यानंतर पोलीस मुख्यालयातील कार्यालयाची झडती घेऊन संगणक, आयपॉडसह अनेक साहित्य जप्त केले होते. त्यानंतर आता वाझेंची डायरीही अधिका-यांच्या हाती लागली आहे. कुणाला किती पैसे जात होते, याचा हिशेब वाझे ठेवत होता. डायरीत मुंबईतील सर्व बार, पब आणि हुक्कापार्लरची यादी दिली आहे. ज्यांनी पैसे दिले त्याची नोंद असल्याचेही समाेर आले आहे. वाझेकडे वसुलीचे काम होते, ती तो रक्कम कोणाला देत होता, याबद्दल अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र मुंबईतील हुक्का पार्लरमधून 11कोटींची वसुली केल्याचे डायरीत नमूद असल्याचे समजते. वाझेच्या अटकेनंतर एनआयएने 5 आलिशान गाड्या, साडेपाच लाखांची रोकड, पैसे मोजण्याची मशीन जप्त केली. तसेच आता संशयित डायरीही हाती लागली आहे. त्यातून वाझेेने केलेल्या आर्थिक उलाढाली स्पष्ट होत असल्याने आता या प्रकरणाचा अधिक तपास हा ईडीकडून होण्याची शक्यता आहे.