नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्या ५ जणांच्या टोळीला बेलतरोडी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ७ इंजेक्शन आणि रोकड जप्त केली आहे. अटक केलेल्यांमध्ये एका नगरसेवकाच्या नातेवाईकाचा समावेश आहे. ४५ हजार रुपयांना ते हे इंजेक्शन विकणार होते.
मनोज वामनराव कामडे (वय ४०, रा. जुनी शुक्रवारी), अतुल भीमराव वाळके (वय ३६, रा. आयुर्वेदिक लेआऊट), पृथ्वीराज देवेंद्र मोहिते (वय ३६, रा. रहाटे कॉलनी), अनिल वल्लभदास ककाणे (वय ५२, रा. टेलिफोन एक्सचेंज चौक) आणि अश्विन देवेंद्र शर्मा (वय ३२, रा. गावंडे लेआऊट, नरेंद्रनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वाळके आणि कामडे यांच्याकडे रेमडेसिवीर इंजेक्शन असून ते त्यांचा काळाबाजार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पालिसांनी त्यांच्यावर नजर ठेवली होती. शुक्रवारी सायंकाळी तो वर्धा मार्गावर इंजेक्शन घेऊन आले होते. पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्या गाडीत ३ इंजेक्शन सापडले. चौकशी केल्यावर नातेवाईकांसाठी आहे असे सांगितले.
पोलिसांनी त्या हॉस्पिटलमध्ये चौकशी केल्यावर कामडे हा खोटे बोलत असल्याचे आढळून आले. त्याच्या घराची झडती घेतली. तेथे आणखी २ इंजेक्शन मिळाले. त्यानंतर आणखी तिघांना वेगवेगळ्या ठिकाणाहून पकडण्यात आले. कामडे नगरसेवकाचा नातेवाईक असून वाळके बांधकाम व्यावसायिक आहे. कामडे आणि वाळके हे या टोळीचे सुत्रधार असून त्यांना ही इंजेक्शने कोठून मिळाली हा तपास पोलीस करीत आहेत.