अहमदनगर : बहुजनसाना ऑनलाइन – यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड पत्रकार बाळ ज. बोठे नाशिकमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा मारला. मात्र, तोपर्यंत तो तेथून पोलिसांना गुंगार देऊन पसार झाला. तपास पथकातील एका अधिकाऱ्यानेच ही खात्रिशीर माहिती दिली आहे.
आठ दिवसांपूर्वी नगर-पुणे महामार्गावर जातेगाव घाटात जरे यांची हत्या झाली होती. या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पत्रकार बोठे हा सूत्रधार असल्याचे व त्यानेच सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तेव्हापासून बोठे फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याचे मोबाइल फोन, पासपोर्ट, वाहने घरीच आढळून आली आहेत. त्याच्याकडील परवानाधारक शस्त्रही पोलिसांनी जप्त केले आहे. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागत नाही.
काल तपास पथकाला गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, बोठे नाशिकमधील एका हॉटेलमध्ये थांबला आहे. त्यानुसार तपास पथक तातडीने नाशिकला रवाना झाले. ज्या हॉटेलमध्ये तो थांबला आहे, तेथे जाऊन तपासणी केली. तो तेथे थांबला असल्याच्या माहितीची खात्री झाली असली तरी पोलीस पोहोचेपर्यंत तो पसार झाल्याचे सांगण्यात आले. आता हॉटेलमध्ये अधिक चौकशी सुरू असून, त्या आधारे शोध सुरू आहे. यापूर्वी काही ठिकाणांहून अशा अफवा पसरल्या होत्या. मात्र, नाशिकमधील माहिती खात्रिशीर होती, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. तरीही तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाल्याचे दिसून येते. या प्रकरणात अटक पाच आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपली. त्यामुळे त्यांना दुपारी पुन्हा पारनेरच्या न्यायालयात हजर करण्यात येत आहे. मधल्या काळात त्यांच्याकडून बरीच माहिती, पुरावे, गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे, सुपारीची रक्कम आणि अन्य पुरावे संकलित केले आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार महिला बालकल्याण अधिकारी विजयमाला माने यांची आज पुन्हा चौकशी करण्यात येत आहे. त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी त्यांची भेट घडवून देण्यात आली. काल त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. आज आणखी काही माहिती घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
बोठेला मदत करणाऱ्या ‘त्या’ व्यक्ती रडारवर
बाळ बोठे याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या व्यक्ती पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत. बोठेला त्याच्या बालिकाश्रम रोडवरील घरातून पळून जाण्यासाठी कोणी मदत केली, तो कोणाच्या कारमध्ये गेला, याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच बोठेबाबत माहिती मिळताच पोलीस त्या माहितीची खात्री करत त्याला पकडण्यासाठी पथके रवाना करत आहेत.