नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – अखिल भारतीय किसान सभेच्या राज्य परिषदेने नाशिक-मुंबई अशी लांब पदयात्रा जाहीर केल्याने यासाठी राज्यातील आदिवासी महिला-पुरुष शहरात धडकले. दुपारी १२ वाजेपासून मोर्चेकऱ्यांचे जत्थे येण्यास सुरुवात झाली. हातात लाल बावटे घेऊन मोर्चेकरी महामार्ग बसस्थानकात दाखल होत होते. दुपारी ४ वाजता ‘लॉंग मार्च’ शहरातून मुंबईच्या दिशेने प्रस्थान करेल.
जय जवान, जय किसान. फडणवीस सरकार होश में आओ… ‘होश में आकर बात करो. आमच्या मागण्या मान्य करा. नाही तर खुर्च्या खाली करा. ‘सरकार हमसे डरती हैं, पुलीस को आगे करती हैं.. अशा घोषणांनी बुधवारी शहर दणाणले होते. हातात लाल बावटा, डोक्यावर लाल टोपी अन् गळ्यात किसान सभेची मफलर घेत मोठ्या संख्येने शेतकरी, आदिवासींचे जत्थे राज्यातील विविध शहरांमधून नाशिकमध्ये दाखल झाल्याने शहरावर ‘लाल वादळ’ घोंगावल्याचे चित्र पहावयास मिळाले.
डॉ. अशोक ढवळे, आमदार जिवा पांडू गावित, किसन गुजर, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले आदींच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या ‘लॉंग मार्च’साठी राज्यभरातून किसान सभेचे कार्यकर्ते शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
किसान सभेचा मोर्चा नाशिक-मुंबई असा जाणार असल्याचे समजल्यानंतर सरकारकडून चर्चेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे संध्याकाळी नाशिकमध्ये दाखल होते. त्यांनी येथील अधिकाऱ्यासोबत आढावा बैठक घेत जिल्ह्यातील मोर्चेकऱ्यांची स्थिती जाणून घेतली. रात्री १० वाजता त्यांनी किसानसभेच्या नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा सुरू केली.
संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास ईदगाह मैदानाकडून आलेल्या मोर्चेकऱ्यांच्या मोठ्या जत्थ्याने अचानकपणे महामार्ग बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर मुंबई नाका पोलीस ठाण्याशेजारी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे मुंबई नाका चौकात काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मोर्चेकऱ्यांनी सुमारे अर्धा तास ठिय्या देत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.