बहुजननामा ऑनलाइन टीम – गेल्या वर्षी भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण असताना देखील चीनी कंपनीला कंत्राट दिल्याने वाद झाला(Re-contract to Chinese company) होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा चिनी कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. दिल्ली-मेरठ आरआरटीएस प्रोजेक्टमधील न्यू अशोक नगर ते शाहिबाबाद मार्गावर जमिनीखालून जाणारा 5.6 किमीचा मार्ग तयार करण्यासाठी शांघाई टनल इंजिनिअरिंग या चीनी कंपनीला कंत्राट दिले आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाने (NCRTC) हे कंत्राट दिले आहे.
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ (एनसीआरटीसी) देशातील पहिली रिजनल रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टीम उभारत आहे. यावेळी त्यांनी चिनी कंपनीला कंत्राट देताना संपूर्ण प्रक्रिया आणि नियमांचे पालन केल्याचे सांगितले आहे. कंत्राट देण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरुन परवानगी घेतली आहे. दिल्ली-गाजियाबाद-मेरठ कॉरिडोअरच्या सर्व नागरी कामांचे कंत्राट देण्यात आले असून या वेळेत काम पूर्ण होईल, अशा वेगाने बांधकाम सुरु आहे. अशी माहिती एनसीआरटीसीच्या प्रवक्त्याने दिली आहे.
गेल्या वर्षी जून महिन्यात शांघाई टनल इंजिनिअरिंग कंपनीची बोली सर्वात कमी असल्याचे समोर आल्यानंतर वाद निर्माण झाला होता. लडाखमधील सैन्य संघर्षामुळे भारत आणि चीनमध्ये तणाव असतानाच हे कंत्राट चिनी कंपनीला देण्यावरुन हा वाद होता. 82 किमी लांबीच्या दिल्ली-गाजियाबाद-मेरठ आरआरटीस कॉरिडोअरला एशियन डेव्हलपमेंट बँक फंडिंग करत आहे.