एकतर्फी प्रेमातून तरुणी व तिच्या मित्राला मारहाण; एकाला अटक

pune-young-woman-and-her-friend-beaten-out-of-one-sided-love-one-arrested

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – एकतर्फी प्रेमातून तरुणी आणि तिच्या मित्रास मारहाण करून मोबाईल, रोख रक्कम हिसकावत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

रवींद्र रामू डोंगरे (वय ३०, रा. जनवाडी, जनता वसाहत) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. एका २४ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार कोथरूड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना १८ एप्रिल रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास मयूर कॉलनी कोथरूड येथे घडली. या गुन्ह्यात यापूर्वी कृष्णा मारुती डोंगरे (वय ३१, रा. श्री सृष्टी अपार्टमेंट, न-हे आंबेगाव) आणि किरण शरद डोंगरे (वय ३१, रा.पीएमसी कॉलनी, जनवाडी कोथरूड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना देखील २६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तरुणीने कृष्णा डोंगरेला प्रेमास नकार दिला होता. त्यानंतर कृष्णाने इतर साथीदारांच्या समवेत तरुणीचा पाठलाग केला. त्यानंतर तिला व तिच्या मित्राला अडवले.

तरुणीला शिवीगाळ करीत तिचा जबरदस्तीने हात पकडला. तर तिच्यासह मित्राला मारहाण केली. आरोपींनी तरुणीचा मोबाईल आणि रोख रक्कम चोरला आहे. आरोपींनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे. आरोपीने जबरदस्तीने तरुणीकडून हिसकावलेला मोबाईल आणि रक्कम हस्तगत करायचा आहे. तसेच पुढील तपासासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील ज्ञानेश्‍वर मोरे यांनी केली.