पुणे : बहुजननामा ऑनलाईन – किरकोळ कारणातून दोन तरुणावर कोयत्याने सपासप वार करत गंभीर जखमी केल्याचा प्रकार मार्केटयार्ड परिसरात घडला आहे. यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. एकाला अटक केली असून, एकजण पसार आहे.
याप्रकरणी बापू भीमा भालशंकर (वय 23) याला अटक केली आहे. तर त्याचा साथीदार पसार आहे. याबाबत अरबाज शेख (वय 22) याने तक्रार दिली आहे. अरबाज हा जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकमेकाना ओळखतात. फिर्यादी अरबाज हा मित्र नितीन सुतार व अतिक बागवान यांचे सोबत जात होता. यावेळी आंबेडकर नगरच्या गल्ली क्रमांक 4 येथे आले असता आरोपी तेथे आले. तसेच गाडी का बंद पाडली आणि शिवी का दिली याचा जाब विचारला होता. या शुल्लक कारणावरून वाद घालत आरोपीने फिर्यादी याच्यावर कोयत्याने वार करत त्याला लथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर मारहाण सुरू असताना नितीन व अतिक हे सोडवण्यास आल्यानंतर त्यांना देखील मारहाण करण्यात आली. वस्तीतच हा प्रकार घडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर आरोपी तेथून लसार झाले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हा दाखल करत एकाला अटक केली आहे. अधिक तपास मार्केटयार्ड पोलीस करत आहेत.