पुणे : बहुजननामा ऑनलाईन – ट्रेड फंडचे सात कोटी रुपये बँकेतून कंपनीच्या खात्यावर ट्रांन्सफर करून त्याद्वारे कमिशन मिळून देण्याच्या अमिषाने सव्वा सात लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला २५ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
राजकुमार वाणी (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी ४७ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.
१३ एप्रिल ते १८ मे २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. वाणी याने फिर्यादींना तो ट्रेड फंड कंपनीमध्ये बिझनेसचे काम करत असल्याचे भासवले. त्या कंपनीत ट्रेड फंड द्वारे बँकेतून ट्रेड फंडचे सात ७ कोटी रुपये हे कंपनीच्या खात्यावर ट्रान्सफर करतो आणि त्याद्वारे तुम्हाला कमिशन मिळून देतो, असे अमिष त्याने फिर्यादींना दाखवले. या ट्रेड फंडचे डिडी पास करण्यासाठी व आरटीजीएस करण्यासाठी फी म्हणून वाणी याने एका बँक खात्यावर २ लाख २५ हजार तर दुस-या बँक खात्यावर ५ लाख रुपये असे एकूण ७ लाख २५ हजार रुपये भरण्यास सांगून फिर्यादींची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपासासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली. या गुन्हाचा तपास सायबर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके करीत आहेत.
४ लाख २४ हजार हस्तगत :
वाणी याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्ह्यातील ७ लाख २५ हजार पैकी ४ लाख २४ हजार २२६ रुपये हस्तगत करण्यात आले असून, उर्वरीत रक्कम हस्तगत करण्यासाठी, त्याने तो ट्रेड फंड कंपनीत नोकरी करत असल्याचे सांगतले असून, तो कोणत्या कंपनीत काम करतो याबाबत तपास करण्यासाठी त्याने फिर्यादींना सात कोटीच्या डीडीची बनावट कॉपी पाठवली होती.
आरोपीकडे होणार या बाबींचा तपास :
– बनावट डीडी आरोपीने कोठे तयार केला?
– त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का?
– त्याने अशा प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली आहे का?