पुणे : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्यात पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पुणे महापालिका व्यवस्थापनाकडून प्रयत्न केले जात आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, प्रशासनला सहकार्य करावे असे आवाहन करुन जारी करण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, क्वारंटाइन सेंटरमधून नागरिक पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. दिल्ली येथील एका 18 वर्षाच्या तरुणीने क्वारंटाईन सेंटरमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तीच अडचणीत सापडली. सध्या या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुण्यात कोरनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरातील एरंडवणा येथील सेंट्रल मॉल येथील क्वारंटाइन सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावरुन तरुणीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. रात्री साडे अकराच्या सुमारास तरुणीने दुसऱ्या मजल्यावरुन खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पळून जाण्याच्या प्रयत्नात भलतंच घडलं. ही मुलगी खिडकीला असलेल्या गजामध्ये अडकली. अनेकांनी प्रयत्न करुन तिची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. अखेर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी हायड्रोलिक कटरच्या सहाय्याने खिडकीचे गज कापून तरुणीची सुटका केली. या तरुणीला महिला सेवा मंडळाच्या व्यवस्थापिकेच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी डेक्कन पोलीस घटनास्थळी हजर होते. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी क्वारंटाइन सेंटर सुरु करण्यात आले आहेत. मात्र, यामधून नागरिक पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याने प्रशासनासमोर नवा प्रश्न उभा राहिला आहे. तरुणी दुसऱ्या मजल्यावरुन खाली येताना तिचा तोल गेला असता तर तिच्या जीवावर बेतले असते.