पुणे : बहुजननामा ऑनलाईन – मास्क कारवाई करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत स्वत:अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. जेधे चौकात ही घटना घडली आहे.
याप्रकरणी गणेश अंकुश मोरे (वय 38, रा. धनकवडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक मोरे यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासन मास्क घालण्यासाठी नागरिकांना सतत सांगत आहे. पण तरीही काहीजण बेफिकीर होत मास्क न वापरताच फिरत आहेत. अश्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. स्वारगेट पोलीस जेधे चौकात रात्री बंदोबस्त करत मास्क कारवाई करत होते. यावेळी मोरे याला मास्क न लावल्याने थांबवले तसेच त्याच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याने उपनिरीक्षक मोरे यांच्याशी झटापट करत त्यांचा गणवेश फाडला. तर उत्तर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच स्वतः अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अधिक तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.