बहुजननामा ऑनलाइन टीम –दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरुणाला मदत करण्यासाठी मोटारीतून उतरलेल्या व्यक्तीलाच टोळक्याने दगडाने मारहाण केली. एवढच नाही तर या टोळक्याने कोयत्याने त्यांच्या मोटारीच्या काचा फोडून परिसरातील इतर दोन मोटारीचे नुकसान केले. ही घटना फुरसुंगीतील गंगानगर रिक्षा स्टँड परिसरात शुक्रवारी (दि.1) सायंकाळी साडेपचच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
सुरज परमेश्वर खरात (वय-19 रा. हडपसर), आकाश रघुनाथ यादव (वय-19 रा. आळंदी रस्ता, भोसरी), रोहित राम सुनेवाड (वय-19 रा. गंगानगर, फुरसुंगी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ऋषिकेश दानवले (वय-26 रा. ढमाळवाडी, हवेली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ऋषिकेश आणि त्यांचा मावसभाऊ शुक्रवारी मोटारीतून जात होते. त्यावेळी गंगानगर परिसरात आरोपी सुरज याची दुचाकी घसरल्याने तो खाली पडला. त्याला उठवण्यासाठी ऋषीकेशने केली असता, तिन्ही आरोपींनी मिळून त्यांनाच दगडाने मारहाण केली. आरोपींनी त्यांच्याकडे असलेल्या कोयत्याने ऋषिकेश यांच्या गाडीच्या काचा फोडून नुकसान केले. याशिवाय आरोपींनी परिसरातील इतर दोन वाहनांची तोडफोड करत परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.डी. राऊत करीत आहेत.