बहुजननामा ऑनलाइन टीम – मेंदीच्या पानावर’ या वाद्यवृदांचे प्रसिद्ध निवेदक बच्चू पांडे (वय 66) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (दि. 27) पुण्यात निधन(Mendichya Panavar) झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आहे. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून पांडे हे आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान बुधवारी त्यांचे निधन झाले. 80 आणि 90 च्या दशकात मराठी आणि हिंदी वाद्यवृंदांची लोकप्रियता शिखरावर होती. या काळात मेंदीच्या पानावर’या वाद्यवृंदाला आणि पांडे यांच्या निवेदनाला चाहत्यांनी डोक्यावर घेतले होते. वाद्यवृंदातील गाणी आणि संगीत या सोबतच पांडे यांचे निवेदन हे मराठी रसिकांसाठी आकर्षण होते. पांडे यांनी या वाद्यवृंदानंतर सुरेखा पुणेकर व इतर काही लावणी कलावंतांच्या लावणीच्या कार्यक्रमाचे निवेदन देखील केले होते.
गाण्याच्या आधी त्या गीताची पार्श्वभूमी, म्हणी, वाक्प्रचार याचा बेमालूम वापर करून पांडे आपले निवेदन खुलवत असल्याने रसिकांना ते कायम भावत असे. कॅसेटच्या जमान्यात आलेल्या ‘मेंदीच्या पानावर’ कॅसेटचे दहा भाग प्रसिद्ध झाले आहेत.