बहुजननामा ऑनलाइन टीम – दाराची कडी लॉक झाल्याने आत अडकलेल्या एका वयोवृध्द महिलेची अग्निशामक दलाच्या जवानांनी सूखरुप ( fire brigade)सुटका केली. पुण्यातील सहकारनगरमधील तुळशीबागवाले कॉलनीत ही घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
अग्निशामक दलांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारनगर भागात एक वयोवृद्ध महिला दाराची कडी लॉक झाल्याने आत अडकल्याची माहिती देणारा फोन अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षात आला होता. तातडीने या घटनेची माहिती जनता वसाहत अग्निशमन केंद्राला देण्यात आली. तसेच पोलिसांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या अडकलेल्या महिलेची माहिती घेत पहिल्या मजल्यावर शिडी लावून पाहणी केली. त्यात त्या पडलेल्या अवस्थेत निदर्शनास आल्या.
यानंतर जवानांनी क्षणाचाही विलंब न करता खिडकी जवळच असलेली लोखंडी जाळी कटरच्या साह्याने कापत त्या घरात प्रवेश करत व कडी उघडून महिलेची सुखरूप सुटका केली. याठिकाणी या ज्येष्ठ महिला घरात काम करताना अचानक पडल्याने त्यांना उठणे शक्य नव्हते व आवाजाला प्रतिसादही देऊ शकत नव्हत्या. तरीदेखील अग्निशामक दलाच्या जवानांनी शिताफीने या महिलेची सुटका केली. अग्निशामक दलाचे जवान महेंद्र सकपाळ, संदिप घडशी व शैलेश गोरे तसेच वाहन चालक ॠषीकेश बिबवे यांनी ही कामगिरी केली आहे.