बहुजननामा ऑनलाइन टीम – पुणे शहरात गुरुवारी (दि.31) 229 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 421 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर(corona ) मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (मंगळवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 3 हजार 819 स्वॅब तपासणी करण्यात आली.
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 246 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. यापैकी 152 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर 94 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात 8 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत. आतापर्यंत 4 हजार 631 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 3 हजार 317 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 78 हजार 769 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 70 हजार 821 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या पुणे शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु झाली असून त्याची नांदी म्हणजे आज पुणे कंटेन्मेंट झोनमुक्त झालं आहे. शहरात आता एकही कंटेन्मेंट झोन उरलेला नसून मार्च महिन्यानंतर प्रथमच असं घडलं आहे.